Wednesday , August 15 2018
Home / ठळक बातमी / ऐन मोसमात कृत्रिम पावसाचा घाट!

ऐन मोसमात कृत्रिम पावसाचा घाट!

Rainfall

वाचकांचा प्रतिसाद : राज्यात यंदा सरासरीपेक्षा 106 टक्के पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असतानाच ऐन मान्सूनच्या आगमनावेळी कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी एका खासगी कंपनीची मदत घेण्यात येणार असून, या प्रयोगासाठी कोट्यवधींचा खर्च केला जाणार आहे. मुळातच चालू वर्षी मान्सून चांगला बरसणार असल्याचे भाकीत असताना कृत्रिम पावसाचा अट्टाहास का आणि कोणासाठी धरला जात आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गतवर्षी पावसाने दिलेल्या ओढीने जिल्ह्यातील येवल्यासह मराठवाड्यात पुण्याच्या एका खासगी कंपनीने कृत्रिम पावसाचे स्वप्न नागरिकांना दाखविले होेते. सरकारने खास या कंपनीला 90 दिवसांच्या प्रयोगासाठी 27 कोटींचे अनुदानही दिले होते. या कंपनीने कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी खास जिल्हा प्रशासनाची परवानगी घेत येवल्यातून ढगांवर रॉकेटही डागले होते. मात्र, तांत्रिक कारणामुळे ते जमिनीवरच फुटले. सतत तीन दिवसांच्या अपयशानंतर कंपनीने निसर्गावरच खापर फोेडत जिल्ह्यातून काढता पाय घेतला होता. त्यानंतर मराठवाड्यात हा प्रयोग कंपनीने केला. मात्र, तेथेही तो प्रत्यक्षात उतरू शकला नाही. परिणामी सरकारचा, पर्यायाने जनतेचा पैसा वाया गेला. मात्र, तहानलेल्या नागरिकांना दोन घोटसुद्धा कृत्रिम पावसाचे पाणी मिळू शकले नाही. आता यावर्षी राज्यात पुन्हा एकदा कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी गतवर्षीच्या कंपनीनेच राज्य सरकारला आर्थिक तरतुदीचे साकडे घातले असून, ही कंपनी जूनमध्ये आपल्या प्रयोगांना सुरुवात करणार आहे.

Artificial mansoon

हवामान खात्याच्या अंदाजानुसार जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यभरात सर्वदूर मान्सून दाखल झालेला असेल. त्यामुळेच ऐन मान्सूनच्या मोसमात कृत्रिम पावसासाठी आग्रह धरून ही कंपनी नवीन असे काय साध्य करू इच्छिते? कृत्रिम पावसावर होणारा खर्च राज्यभरातील धरणांमधून गाळ काढण्यावर खर्च केल्यास त्यातून पावसाळ्यात पाणी साठवणूक क्षमतेत वाढ होण्यास मदत मिळेल. प्रत्यक्षात दोन मिमी पावसाची नोंद नाही गतवर्षी मराठवाड्यात केलेल्या प्रयोगातून जवळपास 200 मिमी पाऊस त्याभागात पडल्याची नोंद कंपनीने केली होती. प्रत्यक्षात मात्र, प्रयोगासाठी वापरण्यात आलेली पद्धत व साधनसामग्रीच चुकीची असल्याची माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात या भागामध्ये दोन मिमी पावसाचीदेखील नोंद झाली नव्हती. अनुकूल वातावरण अन् जागेच्या मर्यादा राज्यातील वातावरण हे कृत्रिम पावसासाठी योग्य नसून या प्रयोगासाठी जागेच्या मर्यादाही आहेत. राज्यात गतवर्षी झालेल्या प्रयोगावेळी प्रयोग होत असलेल्या ठिकाणापासून 50 किलोमीटरच्या परिघात पाऊस पाडण्याचा दावा प्रयोगकर्त्या कंपनीने केला होता. मात्र, राज्यातील सह्याद्री व सातपुडा पर्वतरांगांचा विचार करता हा प्रयोग निव्वळ धूळफेक आहे. मुळातच ज्याठिकाणी असे प्रयोग केले जातात, तेथून जवळपास 50 किलोमीटरच्या परिघात डोंगर, दर्याक, मोठ्या इमारती नसाव्यात, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. मात्र, राज्यात याउलट परिस्थिती आहे. त्यावेळी प्रयोगात वापरण्यात आलेल्या साधनसामग्रीने 10 किलोमीटरच्या परिघात पाऊस पडण्याची सुतराम शक्यता नसल्याचे जाणकारांनी सांगितले. राज्यभरात करण्यात येत असलेले कृत्रिम पावसाचे प्रयोग म्हणजे सरकार व जनतेच्या डोळ्यांत निव्वळ धूूळफेक आहे. जूनमध्ये मान्सून डेरेदाखल झाल्यावर कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. त्यामुळेच ऐन पावसाळ्यात हा प्रयोग राबविण्याची गरज काय आहे, असे पुण्याचे भौतिकशास्त्रज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen + fourteen =