Wednesday , August 15 2018
Home / क्रीडा / क्रिकेटर रोहित शर्मा याच्या हस्ते होणार ‘पुणे इंटरनॅशनल स्पोर्टस् एक्स्पो’चे उद्घाटन

क्रिकेटर रोहित शर्मा याच्या हस्ते होणार ‘पुणे इंटरनॅशनल स्पोर्टस् एक्स्पो’चे उद्घाटन

·           डॉ. विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर साकारणार हे एक्स्पो

·           क्रीडा क्षेत्रातील नवनवीन ‘ट्रेंड्स’ एकाच छताखाली पाहण्याची संधी   

·           मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार कृतज्ञता सोहळा

पुणे, २ मे  : भारताचा आघाडीचा फलंदाज आणि सध्या सुरू असलेल्या आयपीएल मधील मुंबई इंडीयन्स या संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या हस्ते पहिल्या ‘पुणे इंटरनॅशनल स्पोर्टस् एक्स्पो’चे उद्घाटन होणार आहे. ‘स्टेप्स स्पोर्टस् अँड एन्टरटेनमेंट’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणा-या या भव्य क्रीडा प्रदर्शनाचे उद्घाटन येत्या ५ मे रोजी सकाळी १०.३० वाजता  सिंचन नगर येथील कृषी महाविद्यालयाच्या  मैदानावर होणार असून ऑलिम्पिक पदक विजेता गगन नारंग या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. एक्स्पोचे प्रमुख संयोजक डॉ. विश्वजीत कदम यांनी ही माहिती दिली.

अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच उपक्रम असून क्रीडासाहित्यापासून करिअर-पर्यटन, उद्योग-पायाभूत सुविधा, स्पोर्ट्स मेडिसिन-फिटनेस अशा विविध विषयांवर आधारित क्रीडाविषयक उपक्रमांची पर्वणी ‘पुणे इंटरनॅशनल स्पोर्टस् एक्स्पो’च्यामाध्यमातून क्रीडारसिकांना मिळणार आहे.

पद्मश्री गगन नारंग, क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्या हस्ते ५ मे रोजी सकाळी १०.३० वाजता या एक्स्पोचे उद्घाटन होणार असून यावेळी आपला आतापर्यंतचा प्रवास हे दोन्ही खेळाडू उपस्थितांसमोर यानिमित्ताने मांडणार आहेत. एक्स्पोच्या दुस-या दिवशी महिला खेळाडूंप्रती आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचा सत्कार या एक्स्पो दरम्यान करण्यात येणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर देशाची मान उंचावत आपल्या खेळाचे प्रदर्शन करणा-या महिला खेळाडूंचा सत्कार हस्ते होणार आहे.

एक्स्पोच्या तिस-या दिवशी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचे यांच्याप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये टेनिसपटू सानिया मिर्झा यांची आई, हॉकीपटू धनराज पिल्ले यांची आई, क्रिकेटर जाहीर खान यांचे वडील, फुटबॉलपटू सुनील क्षेत्री यांचे वडील, टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे यांचे आई-वडील आदींचा समावेश आहे.

या एक्स्पोची सांगता ‘किक ऑफ मिशन रिओ’ कार्यक्रमाने होणार असून समारोपावेळी आंतरराष्ट्रीय धावपटू पद्मश्री मिल्खा सिंग आणि केंद्र सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाचे माजी राज्यमंत्री जितेंद्र सिंग हे उपस्थित राहणार आहेत.ऑलिम्पिकमधील खेळाडूंना प्रोत्साहन आणि शुभेच्छा देण्यासाठी ‘मिशन रिओ’ या मोहिमेचा प्रारंभ यावेळी होणार आहे. पॅरा ऑलिम्पिक आणि स्पेशल ऑलिम्पिकमधील पदकविजेत्या खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये हा हृद्य सोहळा रंगेल हे विशेष.    

यावेळी बोलताना पुणे स्पोर्टस्एक्स्पोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग शिधये म्हणाले,”या चार दिवसीय एक्स्पोमध्ये आधी नमूद केलेल्या कार्यक्रमांबरोबरच भव्य प्रदर्शनाचाही समावेश असणार आहे. ज्यामध्ये सपोर्ट आणि फिटनेस शी संबंधित १०० हून अधिक स्टॉल्स असतील. यामध्ये  टेक्नॉलॉजी झोन, क्रीडाविषयक तंत्रज्ञानाचे अत्याधुनिक आविष्कार, सिम्युलेटरच्या माध्यमातून फॉर्म्युला वन कार रेसिंग तसेच क्रिकेट, टेनिस, फुटबॉल, गगन नारंग शुटींग रेंज, आर्चरी रेंज, गेमिंग झोन, पेनल्टी शूट आउट, सोनी प्ले स्टेशन, बोकवा, या सध्या लोकप्रिय होत असलेल्या एक्सरसाईजची कार्यशाळा आदींचा अनुभवदेखील उपस्थितांना घेता येणार आहे.”

शाळा महाविद्यालयातील मुख्याध्यापक आणि क्रीडा शिक्षकांचे एकत्रीकरण, स्पोर्टस्मेडिसिन, फिटनेस, डाएट-न्यूट्रिशन आदींसंदर्भात मोफत मार्गदर्शन-समुपदेशन आणि परिसंवादाचे आयोजन या संपूर्ण एक्स्पो दरम्यान करण्यात आले आहे. याशिवाय स्पोर्टस्फॅशन शो आणि बॉडी पॉवर शो हेही या एक्स्पोचे एक खास आकर्षण असेल.

‘पुणे इंटरनॅशनल स्पोर्टस् एक्स्पो’च्या कोअर कमिटीचे सदस्य डॉ. विश्वजित कदम,  विशाल चोरडिया, मंदार ताम्हाणे, सुनंदन लेले, आशिष पेंडसे, पराग शिधये यांच्या संकल्पनेतून या एक्स्पोचे आयोजन करण्यात आले असून सर्वच वयोगटांच्या नागरिकांमध्ये क्रीडा व फिटनेससंदर्भात जागरूकता वाढावी असा यामागचा उद्देश आहे. तरी सर्व क्रीडा रसिकांनी या एक्स्पोला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. सकाळी 11 ते रात्री ९ पर्यंत हे स्पोर्टस्एक्स्पो सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर भरणार असून त्याला २० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे.  

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine − eight =