Sunday , September 23 2018
Home / क्रीडा / क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी ‘पुणे स्पोर्ट्स एक्स्पो’चे आयोजन

क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी ‘पुणे स्पोर्ट्स एक्स्पो’चे आयोजन

·          येत्या ५ ते ८ मे दरम्यान अॅग्रीकल्चर महाविद्यालयाच्या मैदानावर भरणार एक्स्पो

·          भारतामधील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

·          क्रीडाउद्योगाला चालना मिळण्याबरोबरच क्रीडाप्रेमींसाठी देखील ठरणार पर्वणी

 

 पुणे, १० मार्च : क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी पुण्यातील ‘स्टेप्स स्पोर्ट्स अँड एन्टरटेनमेंट’च्या वतीने येत्या ५ ते ८ मे दरम्यान सिंचननगर परिसरातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे इंटरनॅशनल स्पोर्ट्स एक्स्पोचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा स्टेप्स स्पोर्ट्सचे संचालक डॉ. विश्वजित कदम यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. ‘पुणे स्पोर्ट्स एक्स्पो’संदर्भात स्टेप्स स्पोर्ट्स या कंपनीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच उपक्रम असून क्रीडासाहित्यापासून करिअर-पर्यटन, उद्योग-पायाभूत सुविधा, स्पोर्ट्स मेडिसिन-फिटनेस अशा विविध विषयांवर आधारित क्रीडाविषयक उपक्रमांची पर्वणी पुणे स्पोर्ट्स एक्स्पोच्या माध्यमातून क्रीडारसिकांना मिळणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

 प्रसिद्ध क्रिकेटपटू झहीर खान, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री, राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारी पहिली महिला कुस्तीपटू गीता फोगाट यांनी यावेळी पुणे स्पोर्ट्स एक्स्पोच्या बोधचिन्हाचे अनावरण करत क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठीच्या या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमासाठी आपली कटिबद्धताही व्यक्त केली. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी, युवकवर्ग, पालकवर्गाला मोठ्या संख्येने स्पोर्ट्स-फिटनेस संदर्भात जागरूक राहून या उपक्रमाला मोठा प्रतिसाद देण्याचे आवाहनही या खेळाडूंनी यावेळी केले. ‘प्रो स्पोर्ट्स फिटनेस अँड सर्व्हिसेस’ ही क्रिकेटपटू झहीर खानची संस्था ‘पुणे इंटरनॅशनल स्पोर्ट्स एक्स्पोशी संलग्न असणार असून संस्थेतर्फे एक्स्पो दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येतील. ही संस्था फिटनेस आणि न्यूट्रिशन विषयात काम करते.        

Zaheer Khan, Vishwajeet Kadam, Sport Expo
आज पहिल्या पुणे इंटरनॅशनल स्पोर्ट्स एक्स्पो’च्या बोधचिन्हाचे विविध खेळाडूंच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्या समयी डावीकडून डॉ. विश्वजित कदम, झहीर खान, सुनील छेत्री, गीता फोगाट आणि विशाल चोरडिया.

 ​​

पुणे स्पोर्ट्स एक्स्पोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग शिधये, पुणे स्पोर्ट्स एक्स्पोच्या कोअर कमिटीचे सदस्य विशाल चोरडिया, मंदार ताम्हाणे, सुनंदन लेले, आशिष पेंडसे हेही यावेळी उपस्थित होते.

 यावेळी स्टेप्स स्पोर्ट्सचे संचालक डॉ. विश्वजित कदम यांनी पुणे स्पोर्ट्स एक्स्पोच्या संकल्पनेची माहिती दिली. डॉ कदम म्हणाले, ”पुण्याला शैक्षणिक, आयटी अशा विविध क्षेत्रांची मोठी परंपरा आहे. त्याच्याच जोडीला पुणे ही क्रीडानगरी म्हणून देखील ओळखली जाते. सध्या सर्वच वयोगटांच्या नागरिकांमध्ये क्रीडा व फिटनेससंदर्भात जागरूकता वाढत आहे. तसेच, कोणताही आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा, तो आजारच उद्भवू नये, यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेडिसन म्हणून देखील स्पोर्ट्स आणि फिटनेस याचे महत्व वाढते आहे. म्हणूनच,क्रिकेट, टेनिस, फुटबॉल, बॅडमिंटन अशा सर्वंच खेळांचा समावेश असलेले हे स्पोर्ट्स एक्स्पो क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरेल. तसेच, पुण्याचा क्रीडावारसा अधिक दृढ करण्यासाठी पुणे स्पोर्ट्स एक्स्पोची मोलाची भर पडेल असा आम्हाला विश्वास आहे.”

 पुणे स्पोर्ट्स एक्स्पोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग शिधये यांनी यावेळी पुणे स्पोर्ट्स एक्स्पोसंदर्भात उपस्थितांसमोर सादरीकरण केले. पुणे स्पोर्ट्स एक्स्पोसंदर्भात सल्लागार समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये क्रीडासंघटनांचे पदाधिकारी, प्रशिक्षक व खेळाडू यांचा सहभाग आहे. हेमंत बेंद्रे, उदय साने, राजीव दातार, प्रसन्न चौधरी, सुंदर अय्यर, अभिजित कुंटे, कौस्तुभ राडकर, कमलेश मेहता आणि शुभांगी कुलकर्णी हे या समितीमध्ये आहेत. तसेच, पुणे स्पोर्ट्स एक्स्पोच्या घोषणेच्या निमित्ताने सर्व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी व क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांसमवेज झहीर, सुनील आणि गीता यांच्या संवादसत्राचे आयोजन करण्यात आले होते. पुणे स्पोर्ट्स एक्स्पोच्या यशस्वीतेसंदर्भात त्यांनी या वेळी मोलाच्या सूचना केल्या.

  

अशी आहेत पुणे स्पोर्ट्स एक्स्पोची वैशिष्ट्ये –

भारतामधील अशा प्रकारचा हा पहिलाच स्पोर्ट्स एक्स्पो असून चीनमधील शांघाय आणि जर्मनीतील म्युनिक शहरांमध्ये असे एक्स्पो आयोजित केले जातात. २०० हून अधिक दालनांच्या माध्यमातून क्रीडाविषयक उपक्रमांची रेलचेल या एक्स्पोमध्ये असणार आहे. ऑलिम्पिकमधील खेळाडूंना प्रोत्साहन आणि शुभेच्छा देण्यासाठी ‘मिशन रिओ’ या मोहिमेचा प्रारंभ या एक्स्पो मध्ये होईल. पॅरा ऑलिम्पिक आणि स्पेशल ऑलिम्पिकमधील पदकविजेत्या खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये हा हृद्य सोहळा रंगणार आहे. याबरोबरच टेक्नॉलॉजी झोनमध्ये क्रीडाविषयक तंत्रज्ञानाचे अत्याधुनिक आविष्कार. तसेच, स्टीम्युलेटरच्या माध्यमातून क्रिकेट, टेनिस, फुटबॉल, फॉर्म्युला वन शर्यतीतील तंत्रज्ञानाचा अनुभवदेखील उपस्थितांना घेता येणार आहे. स्पोर्ट्स मेडिसिन, फिटनेस, डाएट-न्यूट्रिशन आदींसंदर्भात मोफत मार्गदर्शन-समुपदेशन आणि परिसंवादाचे आयोजन या दरम्यान केले जाणार आहे. याशिवाय स्पोर्ट्स फॅशन शो आणि बॉडी पॉवर शोच्या माध्यमातून क्रीडामनोरंजनाचा देखील विविधरंगी आविष्कार या एक्स्पोमध्ये अनुभवायला मिळेल. दिग्गज खेळाडू, क्रीडा उद्योजक यांच्या सहभागाने क्रीडाविषयक परिसंवादाचे आयोजन या सोहळ्यात करण्यात येणार आहे.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 4 =