Wednesday , August 15 2018
Home / ठळक बातमी / यंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान

यंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान

सेव्ह द अर्थ, इट्स द ओन्ली प्लॅनेट दॅट मेक्स फिल्मस् !

 

  • महोत्सवात ७ ठिकाणच्या १३ स्क्रीन्सवर २०० हून अधिक चित्रपटपाहण्याचा रसिकांना संधी
  • पिफ बझारच्या दुस-या आवृत्तीमध्ये चित्रपट रसिक आणि तज्ज्ञ येणार एकत्र

पुणे, १६ डिसेंबर : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा १२ ते १९ जानेवारी, २०१७ दरम्यान होणार असल्याची माहिती महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. दरवर्षी चित्रपट प्रेमींना प्रतिक्षा असलेला आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या या महोत्सवाचे हे १५ वे वर्ष असून यावर्षीच्या महोत्सवात २०० हून अधिक चित्रपटांचा आस्वाद चित्रपट रसिकांना घेता येणार आहे. याबरोबरच दरवर्षी प्रमाणे चित्रपटांबरोबरच अनेकविध कार्यशाळा, चर्चासत्र, प्रदर्शनी यांचा अंतर्भावही महोत्सवात असेल.

एन्व्हायर्नमेंट (पर्यावरण)या संकल्पनेवर यावर्षीचा महोत्सव आधारित असणार असून यासंबंधीच्या बोधचिन्हाचे अनावरणही पत्रकार परिषदेदरम्यान करण्यात आले. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व महोत्सवाचे उपाध्यक्ष समर नखाते, सचिव रवी गुप्ता, विश्वस्त डॉ. मोहन आगाशे, विठ्ठल मणियार, सतीश आळेकर, मकरंद साठे, हेही यावेळी उपस्थित होते.

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी पुण्याबरोबरच पिंपरी चिंचवड शहरात सात ठिकाणी तब्बल १३ स्क्रीन्सवर  महोत्सवातील चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत. ज्यामध्ये पुण्यातील सिटी प्राईड कोथरूड, सिटी प्राईड सातारा रस्ता, सिटी प्राईड आर डेक्कन, मंगला मल्टीप्लेक्स, आयनॉक्स बंड गार्डन रस्ता, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) यांचा व पिंपरी चिंचवड मधील चित्रपटगृहांचा समावेश आहे.

यावेळी बोलताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले, “ यंदाच्या वर्षी ‘सेव्ह द अर्थ, इट्स द ओन्ली प्लॅनेट दॅट मेक्स फिल्मस् ! ‘ही‘थीम’ असून चित्रपट आणि करमणूकीच्या माध्यमातून पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करून निसर्ग पर्यायाने पृथ्वीचे रक्षण करणे हे आमचे ध्येय आहे.’’

याबरोबरच मागील वर्षी मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर याहीवर्षी तब्बल १० हजार स्केअर फूट  इतक्या विस्तीर्ण जागेत ‘पिफ बझार’ साकारणार आहे. चित्रपट प्रेमींसाठी एका हक्काच्या व्यासपिठाबरोबरच यावर्षी ‘पिफ बझार’मध्ये ३० हून अधिक स्टॉल्स् असणार आहेत. ज्यामध्ये चित्रपट प्रेमी, फिल्म आर्ट स्पेशलिस्टस्, यांसाठी चर्चासत्रे, कार्यशाळा, खुले व्यासपीठ, सांस्कृतिक कार्यक्रम यांचीही रेलचेल यामध्ये असणार आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पुरस्कार विजेत्या चित्रपटांना मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना मिळत असलेली दखल लक्षात घेत यावर्षीच्या महोत्सवासाठी ९५ देशांमधून तब्बल १००० हून जास्त चित्रपटांनी आपला सहभाग नोंदविला आहे, असे डॉ. पटेल यांनी यावेळी नमूद केले.

 

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील चित्रपट विभाग खालीलप्रमाणे –

‘फोकस’ विभाग

१)     थीम सेक्शन – एन्व्हायर्नमेंट (पर्यावरण)

२)     सोशल अवेअरनेस

३)     ग्रेशिया लॉर्सा यांच्या साहित्यावर आधारित चित्रपट

४)     चित्रपटांतील स्पॅनिश डान्स प्रकार

५)     सिंहावलोकन (रेट्रोस्पेक्टिव्ह)

६)     पुरस्कारप्राप्त चित्रपट

७)     ज्युरी चित्रपट

स्पर्धात्मक विभाग-

१)    आंतरराष्ट्रीय चित्रपट

२)    मराठी चित्रपट

३)    फोक्सवॅगन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट

 

‘ग्लोबल’ विभाग –

१)     ग्लोबल चित्रपट

२)     आशिया खंडामधील चित्रपट

३)     लॅटीन- अमेरिकन चित्रपट

४)     देश विशेष (कंट्री फोकस)

५)     विभिन्न देशांतील लक्षणीय चित्रपट (कॅलिडोस्कोप)

‘अदर्स’ विभाग –

१)     इंडीयन सिनेमा टुडे

२)     मराठी सिनेमा टुडे

३)     जेम्स फ्रॉम नॅशनल फिल्म्स् अर्काईव्ह्स् ऑफ इंडिया (एन.एफ.ए.आय)

४)     फिल्स फ्रॉम फिल्म्स डिव्हिजन

५)     ट्रीब्युट

सॅटेलाईट चित्रपट महोत्सव असणारा पिफ हा एकमेव महोत्सव असून आतापर्यंत पुण्यासह तो पिंपरी चिंचवड, मुंबई व औरंगाबाद येथे भरविण्यात येतो. यंदा यामध्ये सोलापूर व नागपूर या दोन शहरांची भर पडणार असून नागपूर शहरात हा महोत्सव ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या नावाने भरविला जाणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. या सर्व महोत्सवांमध्ये पिफ मधीलच काही निवडक चित्रपट दाखविले जातात ज्याची निवड ही पिफ चीच निवड समिती करीत असते.

या महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रातिनिधिक नोंदणी प्रक्रियेची माहिती www.piffindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून शुक्रवार दि. १६ डिसेंबर म्हणजे आजपासून ही नोंदणी सुरु करण्यात आली आहे. वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. संकेतस्थळावर नोंदणी झाल्यानंतर मिळालेल्या नोदंणी क्रमांकासोबत इच्छुकांनी सिटी प्राईड, कोथरूड, सातार रस्ता व मंगला चित्रपटगृह, आयनॉक्स, बंडगार्डन रस्ता येथे जाऊन स्पॉट रजिस्ट्रेशन करणे अपेक्षित आहे. हे स्पॉट रजिस्ट्रेशन २९ डिसेंबरपासून वर सांगितलेल्या ठिकाणी सकाळी ११ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे याची कृपया नोंद घ्यावी.

विद्यार्थी व फिल्म क्लब सभासद व ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांपुढील ) यांना ओळखपत्र दाखवून रुपये ६०० मध्ये रजिस्ट्रेशन करता येणार आहे. तर इतर इच्छुकांसाठी ही किंमत रुपये ८००  इतकी असेल. यंदाच्या वर्षी रोख रकमेचा तोटा असल्या कारणाने रोख रकमेबरोबरच क्रेडीट अथवा डेबिट कार्डच्या उपयोगाने देखील चित्रपट रसिकांना रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

Check Also

भाडेकरुंच्या माहितीची पोलीस पडताळणी आता ऑनलाईन

पुणे, दि. 9 डिसेंबर : पुणे पोलीसांनी आता ऑनलाईन जगात आणखीन एक पाऊल टाकले आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 + 4 =