Wednesday , August 15 2018
Home / ठळक बातमी / ‘रंगा पतंगा’ पोहोचले आंतरराष्ट्रीय स्तरावर

‘रंगा पतंगा’ पोहोचले आंतरराष्ट्रीय स्तरावर

इटलीतील रिव्हर टू रिव्हर चित्रपट महोत्सवात 8 डिसेंबर रोजी स्क्रीनिंग

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह राज्य पुरस्कारात सर्वोत्तम ठरलेल्या रंगा पतंगा या चित्रपटानं आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोहोर उमटवली आहे. इटलीतील ‘रिव्हर टू रिव्हर इंडियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये रंगा पतंगाची निवड झाली आहे. 8 डिसेंबरला या चित्रपटाचं महोत्सवात स्क्रीनिंग होणार आहे. या महोत्सवात रंगा पतंगा हा एकमेव मराठी चित्रपट आहे.

poster

3 ते 8 डिसेंबर दरम्यान इटलीतील फ्लोरेन्स शहरात हा महोत्सव होत आहे. ‘रिव्हर टू रिव्हर’ महोत्सवात यापूर्वी डोंबिवली फास्ट, मातीमाय, फँड्री हे मराठी चित्रपट दाखवण्यात आले होते. यंदा हा मान ‘रंगा पतंगा’नं पटकावला आहे. ‘रंगा पतंगा’ या सिनेमात जुम्मन या विदर्भातील शेतकऱ्याची गोष्ट उलगडण्यात आली आहे. आजुबाजूला भवताल बदलत असताना बैलजोडी सांभाळून शेती करणाऱ्या आणि या बैलजोडीच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या शेतकऱ्याला सोसाव्या लागणाऱ्या समस्यांचे चित्रण हा सिनेमा करतो. वेगळ्या पद्धतीने ही गोष्ट उलगडताना सामाजिक परिस्थितीवर आणि व्यवस्थेच्या अनास्थेवरही हा सिनेमा मार्मिक पद्धतीने भाष्य करतो. सिनेमॅटोग्राफर अमोल गोळे यांच्या फ्लाईंग गॉड फिल्मनं चित्रपटाची निर्मिती केली आहे. मकरंद अनासपूरे, नंदिता धुरी, संदीप पाठक, गौरी कोंगे, भारत गणेशपुरे, उमेश जगताप, तेजपाल वाघ आदींच्या चित्रपटात भूमिका आहेत.

 

एप्रिलमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडूनही पसंतीची पावती मिळाली होती. 14व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा संत तुकाराम पुरस्कार आणि प्रसाद नामजोशी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला होता. त्याशिवाय राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट, आदर्श शिंदे यांना सर्वोत्कृष्ट गायक आणि संदीप पाठक यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. त्याशिवाय सह्याद्री सिने अवॉर्ड्समध्ये चिन्मय पाटणकर यांना कथा आणि सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. संस्कृती कला दर्पण पुरस्कारांतही ‘रंगा पतंगा’ला पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. चिन्मय पाटणकर यांनी चित्रपटाची कथा, सागर वंजारी यांनी संकलन, अनमोल भावेनं साऊंड डिझाईन, कौशल इनामदार यांनी संगीत आणि इलाही जमादार यांनी गीतलेखन केलं आहे.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 − 11 =