
पुणे न्यूज नेटवर्क : सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती या उजव्या संघटनांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे आशिष खेतान यांनी आज केला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला येत्या 20 ऑगस्टला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभुमीवर तपासाबाबत अनेक दावे खेतान यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहेत.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपास करणा-या संस्थांना सनातन आणि हिंदू जनजागृती समितीच्या साधकांची ओळख पटल्याचा दावाही त्यांनी केला आहे. याप्रकरणी कॉंग्रेसनेही या संस्थांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दुस-या ट्विटमध्ये खेतान म्हणाले की, सनातन संस्थेने गोवा व महाराष्ट्रामध्ये काही बॉंबस्फोट घडवले आहेत. या संघटनांवर बंदी घालण्यासाठी सुरक्षा संस्था प्रयत्नशील होत्या; परंतु कॉंग्रेस सरकार याबाबतीत अपयशी ठरले. दाभोलकर प्रकरणाचा तपास सुरक्षा दलांनी पूर्ण केला असून या हत्येमध्ये सनातन संस्थेचे साधक व हिंदू जनजागरण समितीचे कार्यकर्ते सहभागी असल्याचेही खेतान यांनी म्हटले आहे.
